Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

शांत आदिवासींना पेटवू नका!

शांत आदिवासींना पेटवू नका!

नाशिक - अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश करून शांत असलेल्या आदिवासींना पेटवू नका, असा खणखणीत इशारा आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी आपल्याच आघाडी सरकारला दिला. विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांनीही पिचडांच्या भूमिकेला पाठिंबा देत आरक्षण बदलण्याचा निर्णय घेऊन आघाडी सरकारने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये, असा आघाडी सरकारला आज घरचा आहेर दिला. खऱ्या आदिवासी जमातीमधील बिगरआदिवासी जातींची घुसखोरी थांबविण्यासाठी विविध पक्ष- संघटनांतर्फे आयोजित केलेल्या आदिवासींच्या निर्धार मेळाव्यात हे दोन्ही नेते आज बोलत होते. पिचड म्हणाले, की "एसटी‘मध्ये अन्य जातींचा समावेश करू नये यासाठी राज्यातील सर्व
आदिवासी आमदारांनी सनदशीर मार्गाने शासनाला निवेदने दिली आहेत. मात्र, आपल्या स्वाभिमानासाठी व आपल्या हक्कांसाठी सर्व आदिवासींनी जागरूक राहिले पाहिजे.

नव्याने होऊ घातलेला पालघर जिल्हा हा घटनेच्या सहाव्या सूचीनुसार स्वायत्त व्हायला हवा.
त्याबाबतचा निर्णय झाल्यानंतर या जिल्ह्यातील आदिवासीबहुल क्षेत्राच्या विकासासाठी मदत
मिळेल आणि पुढच्या पिढीला स्वाभिमानी करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. या समाजासाठी आज सर्व
आमदार व खासदार राजकारण सोडून एकत्र आले आहेत. वसंत पुरके म्हणाले, की आदिवासींच्या हक्कांवर होणारे अतिक्रमण पाहता आजची रात्रच नव्हे, तर दिवसही वैराचा आहे. ही वेळ सर्वांनी निश्चिंत बसायची नसून येत्या 22 जूनला नागपूर येथे होणाऱ्या निर्धार मेळाव्यात सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. आम्ही आदिवासी जनतेच्या बाजूने उभे राहिलो म्हणून अनेकांनी आमचे पुतळे जाळले काय किंवा आम्हाला जाळले काय मात्र, आमच्या विचारांना ते कधीही जाळू शकत नाहीत. राज्य सरकारकडून "एसटी‘मध्ये घुसखोरी करणाऱ्यांना आश्वासने दिली गेली असल्याचे समजते. मात्र, नियमानुसार तसा बदल होणे शक्य नसल्याचे पुरके यांनी सांगितले.Find us on Facebook