Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

सामाजिक बांधिलकीची ‘आदियुवा’ चळवळ

सामाजिक बांधिलकीची ‘आदियुवा’ चळवळ

आदिवासी भागातला एक मुलगा कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बीईपर्यंत उच्चशिक्षण घेतो. डहाणू ते मुंबई, मुंबई ते तुळजापूर आणि तुळजापूर ते थेट हैदराबाद असा प्रवास करत ‘हुंदाई’ कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागात रुजू होतो. त्याचा प्रवास नोकरीपर्यंत थांबत नाही. आपण कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय पुढे आलो, अनेक गोष्टींसाठी खस्ता खाल्ल्या तसे हाल शिक्षणासाठी शहरात येणा-या आदिवासी, ग्रामीण भागातील मुलांचे होऊ नयेत, या सामाजिक बांधिलकीने तो ‘आदियुवा.इन’हे संकेतस्थळ तयार करतो आणि त्यातून एक ऑनलाइन चळवळच उभी राहते. सचिन सातवी या डहाणूतील आदिवासी मुलाची ही भरारी. एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करताना उरलेला वेळ समाजासाठी देता-देता तो ‘सोशल आंत्रप्रुनर’ झाला आहे. भारतातील अशाच २० ते ३० वर्ष वयोगटांतील ‘सोशल आंत्रप्रुनर्स’वर ‘बीबीसी’ बनवत असलेल्या माहितीपटात सचिनचाही समावेश आहे.

हैदराबादसारख्या जुनी आणि नवी अशी संमिश्र संस्कृती असलेल्या शहरातील एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या कार्यालयातून एक तरुण आपलं काम आटोपून घरी येतो. ताजातवाना होऊन पुन्हा पाच-सहा तास संगणकासमोर बसतो. ‘आदियुवा’शी संबंधित प्रत्येक ई-मेल आणि लिंक वाचतो, मेसेजचं अदानप्रदान करतो. ‘आदियुवा’ ही एक अशी वेबसाइट आहे की, जिच्यावर आदिवासी मुलांसाठी नोकरीच्या जाहिराती, मार्गदर्शन शिबिरं, लेख, आदिवासी समाजाची आजची स्थिती, न्याय-अन्याय्य, पीडित, फसवणुकीचे प्रकार याविषयीच्या बातम्या यांची माहिती असते. ‘हुंदाई’च्या संशोधन आणि विकास विभागात ‘ट्रिम डिझायनिंग’चा विभागप्रमुख आणि व्यवस्थापक असलेला २९ वर्षाचा सचिन सातवी दररोज ती न विसरता अपडेट करतो. तो त्याच्या दिनक्रमाचाच हा एक भाग आहे, असं म्हटलं तरी हरकत नाही.
डहाणूतील वाघाडी गावात जन्मलेल्या सचिनचं बालपण खरं तर सर्वसाधारण आदिवासी मुलांसारखं गेलं. मल्हार कोळी जमातीची बहुसंख्या असलेल्या गावात एकत्र कुटुंबात तो वाढला. वडील शिक्षक तर आई आश्रमशाळेत स्वयंपाकी म्हणून काम करायची. त्याचे आई-वडील नोकरीला असल्यामुळे सगळया कुटुंबाची आर्थिक जबाबदारी त्यांच्यावरच होती. लहानपणी नदीवर भटकणं, करवंदं खाणं, पक्षी, मासे पकडणं या गोष्टी सुरू होत्या. निसर्गाचा थेट सहवास आणि प्रभावही सचिनच्या जडणघडणीत मोठा होता.
वडिलांची बदली तलासरी तालुक्यात उधवा येथे झाली आणि सचिनच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. तिथे नव्यानं आश्रमशाळा चालू करायची होती. या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून सचिनच्या वडिलांचीच नेमणूक करण्यात आली. खरं तर तेच या शाळेचे अधीक्षक, शिक्षक सगळेच होते. या नवीन शाळेत आई स्वयंपाकाचं सर्व काम करायची. एका गोठयातच ३० मुलांची आश्रमशाळा सुरू झाली. सचिनचंही चौथीपर्यंतचं शिक्षण याच शाळेत झालं. या शाळेतील सर्व विद्यार्थी गुरांबरोबर गोठयात झोपत असत. आंघोळ करायला दोन किमी दूर जावं लागे. पाचवीसाठी सचिनने वाणगावच्या जगमोहन महादेवसिंग ठाकूर (जेएमटी) शाळेत प्रवेश घेतला. तिथे वसतीगृहाची सोय होती. घरापासून पहिल्यांदाच लांब राहिलेला सचिन तेव्हा १० वर्षाचा होता. हाही टप्पा त्याला आयुष्यात महत्त्वाचा ठरला. आयुष्यात किती कठोर मेहनत करणं आवश्यक आहे, याचा जाणीव त्याला तिथे पहिल्यांदा झाली.
या खासगी शाळेत विद्यार्थ्यांनाच सर्व कामे करावी लागत असत. उदा. रस्ते, नारळाची बाग साफ करणे वगैरे. दिवाळीची सुट्टी संपवून परत गेल्यावर २५ घमेली सुकं शेण शोधून आणून ते चिकू, नारळाची झाडांना (सेंद्रीय खत) घालावं लागत असे. सचिन याविषयी सांगतो, ‘या सगळया कामांमुळे आणि घरापासून लांब असल्यामुळे मला अक्षरश: रडू यायचं. शेणांसाठी ५-१० किलोमीटर पायपीट करावी लागायची. शेण शोधायला एकाच वेळी शाळेतील सगळी मुलं बाहेर पडत असल्यामुळे शेण संपून जायचं. त्यामुळे शाळा-बिळा सोडून गावी परतावं, असं वाटायचं. पण हळूहळू आत्मविश्वास वाढला आणि तिथली कामं एक नियम समजून मी करू लागलो. या शाळेत जेवणात मोजूनच एकवाटी भात, डाळ, भाजी मिळायची. शिवाय या जेवणाला चव नसायची. म्हणून शनिवारी, रविवारी घरी गेल्यावर जेवणाला चव येण्यासाठी मी घरून चटणी घेऊन जायचो.’
या शाळेला, इथल्या कामांना कंटाळून त्याने पुन्हा उधयाच्या शाळेत प्रवेश घेतला आणि सहावी-सातवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्याने आठवीला तलासरीतील ठक्करबाप्पा विद्यालयात प्रवेश घेतला. ही तालुक्याची शाळा होती. स्पर्धात्मक वातावरण होतं. वसतिगृहात राहून आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. ‘तिथल्या सामाजिक उपक्रमांचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव त्याच्यावर पडला. साडेपाचला उठून व्यायाम करणं, परिसर स्वच्छ करा, असा दिनक्रम असायचा. पण नंतर शाळा आणि वसतिगृहाशी मी एकरूप झालो. इतका की, तीन वर्षे तो शाळेचा आदर्श विद्यार्थी होतो. कळत-नकळतपणे त्याला सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची प्रेरणा इथूनच मिळाली. शाळेबाहेर, तलासरी परिसरात अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात होते. डॉक्टर, समाजसेवक, चांगल्या नोक-या सोडून नि:स्वार्थीपणे समाजकार्य करणारे, स्वत:ला समाजासाठी वाहून घेणा-या अनेकांशी भेट झाली, ओळख झाली. हे एवढं करू शकतात, तर आपण काही का करू नये, असं मला वाटू लागलं ते याच काळात..’ सचिन सामाजिक बांधिलकीची पेरणी आपल्यात नेमकी कधी झाली त्याविषयी सांगतो.
ठक्करबाप्पा विद्यालयात दहावीला इतर सगळया विषयांसह अतिरिक्त म्हणून सचिनने एलिमेंट ऑफ इंजिनीअरिंग (अभियांत्रिकीचे मूलभूत तत्त्व) विषय घेतला होता. विज्ञान आणि गणितात रुची होती. नववी-दहावीत त्याने बीजगणित आणि भूमितीत सर्वात जास्त गुण मिळवले. गणिताचा प्रश्न फळ्यावर लिहून पूर्ण होईपर्यंत सचिन तो तोंडी सोडवत असे. दहावीला त्याला ६८ टक्के मिळाले. तलासरीत आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये पहिला आला, तर पूर्ण तलासरीत तिसरा. वसतिगृहातर्फे त्याचा मोठा सत्कार करण्यात आला. त्याची चित्रकलाही चांगली होती. तसंच इंजिनीअरिंग ड्रॉईंगही चांगलं होतं. दहावीच्या अभियांत्रिकीची मूलभूत तत्त्वं या विषयामुळे त्याला दहावीनंतर थेट मॅकेनिकल इंजिनीअिरंगच्या मुंबईच्या भगुबाई अभियांत्रिकी महाविद्यालयात आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणा-या आरक्षणाच्या कोटय़ातून डिप्लोमाला प्रवेश मिळाला.
मुंबईतील अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम चार वर्षाचा होता. सचिन अभियांत्रिकीच्या शिक्षणाबद्दल सांगतो, ‘सगळा अभ्यासक्रम इंग्रजीतून असल्यामुळे सुरुवातीचे तीन-चार महिने काही कळतच नसे. शिक्षक शिकवताना शेजारी बसलेले विद्यार्थी हसायचे म्हणून मीही हसायचा, त्यांच्या हावभावाप्रमाणे स्वत:च्या चेह-यावर हावभाव आणायचो. पण कळायचं काहीच नाही. नंतर हळूहळू सर्व कळू लागलं. शाळेत असताना अभियांत्रिकीची मूलतत्त्वं या विषयाचा मराठीत असलेला अभ्यासक्रमच इंग्रजीतून शिकवला जात होता, हे माझ्या लक्षात आलं.’
महाविद्यालयात असताना तो सुरुवातीला दररोज डहाणू ते मुंबई असा प्रवास करायचा. नंतर जोगेश्वरीमधील वसतिगृहात प्रवेश मिळाला. यादरम्यान अनेक हेलपाटे घालावे लागले. त्यातूनच डोक्यात ‘आदियुवा’ची संकल्पना तयार झाली. ‘मला ग्रामीण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे,’ ही भावना आणखी घट्ट झाली. तिथेच त्याच्यासारखे तलासरी, जव्हार, डहाणूमधून आलेले आणखी दोन-तीन आदिवासी विद्यार्थी भेटले. ‘आदियुवा’चा पाया रचला गेला. पण, ही संकल्पना पुढे नंतर अनेक वर्षानंतर प्रत्यक्षात आली. डिप्लोमात ७४ टक्के मिळाले, पण डिप्लोमानंतरही फक्त सुपरवायझरसारखीच नोकरी मिळेल, असं लक्षात आल्यानंतर ‘बॅचलर ऑफ इंजिनीअर’(बीई) करण्याचा निर्णय घेतला. डिप्लोमा केल्यामुळे बीईच्या दुस-या वर्षात थेट प्रवेश मिळू शकत होता. पण बीईसाठीचा प्रवेश हा खुल्या गटातूनच होत असे. डिप्लोमा करून बीई करणा-यांसाठी केवळ १० टक्के जागा होत्या. गुण कमी असल्यामुळे त्याला मुंबईबाहेर तुळजापूरला मराठवाडा विद्यापीठात प्रवेश मिळाला. तिथली तीन र्वष सहज सरली. सचिन सांगतो, ‘इंजिनीयरिंगमधील डिग्री मिळाली तरी नोकरीची हमी कमीच होती. त्यामुळे पुन्हा डोक्यात विचारचक्र सुरू झाली. त्यामुळे एका दैनिकात जाहिरात पाहून मी हैदराबादला सेंट्रल इन्स्टिटयूट ऑफ प्लॅस्टिक इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी’मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. प्लॅस्टिकच्या वस्तूंचं डिझायनिंग शिकण्यासाठी ‘मास्टर प्रोग्रॅम इन कॅडकॅम अँड प्रोडक्ट मोल्ड डिझायनिंग’साठी प्रवेश घेतला. विशेष म्हणजे, बीईचा निकाल लागल्यानंतर दोन दिवसांत मी हा निर्णय घेतला. या सहा महिन्यांच्या अभ्यासक्रमाचं शुल्क ९० हजार होतं. पण वसतिगृहाची सोय होती. अभ्यासक्रम पूर्ण होता होता समजलं की, दक्षिण कोरियाची प्रख्यात मोटार कंपनी ‘हुंदाई’चा हैदराबादमध्ये
आर अँड डी विभाग स्थापन होत आहे. कॅम्पस इंटरव्यूव्ह देऊन २००७मध्ये तो हुंडाईत शिकाऊ अभियंता म्हणून दाखल झाला. कॅडकॅममध्ये प्रवेशावेळी वडिलांनी त्यांचे पीएफचे पैसे दिले, कर्ज काढले होते. नवीन घर बांधण्याचं स्वप्न बाजूला ठेवून वडिलांनी हे सगळं केलं होतं. या सर्व गोष्टी मला पुढे अनेक वर्षानी समजल्या.’
‘हुंदाई’त डिसेंबर २००७ मध्ये सचिन शिकाऊ अभियंता म्हणून नोकरीला लागला. तिथे देशभरातील कर्मचारी होते. त्यांचे फर्डे इंग्रजी ऐकून तो चकीत होत असे. नोकरीला एक वर्ष पूर्ण होऊन नोकरीत कायम होण्याआधीच कोरियात अद्ययावत प्रशिक्षण घेण्यासाठी चार जणांची निवड झाली. त्यात सचिनचाही सहभाग होता. यादरम्यान त्याने दक्षिण कोरियन संस्कृती जवळून पाहिली. त्यांची कार्यपद्धत अनुभवली. त्यांच्या एकूणच कार्यसंस्कृतीचा त्याच्यावर प्रभाव पडला. एक महिन्याच्या प्रशिक्षणानंतर परत आल्यावर त्याला टीम लीडर (रिसर्च इंजिनीअर) म्हणून बढती मिळाली.
‘हुंदाई’मध्ये २००८ व २००९मध्ये उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार मिळाला. २००९मध्ये तीन महिन्यांसाठी पुन्हा कोरियात जाण्याची संधी मिळाली. परत आल्यावर त्याने इथल्या कर्मचा-यांना प्रशिक्षण दिलं. २०१०मध्ये पुन्हा विशेष प्रकल्पासाठी तीन महिने संधी मिळाली. सहा वर्षात सहा बढत्या मिळाल्या. काम पाहून इतर कर्मचा-यांपेक्षाही त्याला जलद गतीने बढती मिळाली. कॉपरेरेट संस्कृतीचा एक नियम तो सांगतो, ‘आव्हानात्मक काम केलं की, तुम्हाला डोक्यावर घेतलं जातं आणि काही चुकलं तर तात्काळ काढूनही टाकलं जातं. त्यामुळे अत्यंत जागरूक राहून काम करावं लागतं.’ सध्या तो ‘हुंदाई’च्या वाहन अभियांत्रिकी विभागातील ट्रिम डिझायनिंगचा विभागप्रमुख आणि व्यवस्थापक आहे. ‘हुंदाई’ कंपनीच्या मोटारगाडयांची संपूर्ण अंतर्गत रचना तयार करण्याचं काम त्याच्या देखरेखीखाली होते. विशेष म्हणजे, दररोजचं काम उरकल्यानंतर दिवसाच्या कामाची माहिती त्याला थेट कोरियातील विभागप्रमुखाला कळवावी लागते.
आयुष्यात खाव्या लागणा-या खस्तांमधूनच ‘आदियुवा’ वेबसाइटच्या निर्मितीची कल्पना त्याला सुचली. इंजिनीअरिंगचं शिक्षण घेताना त्याच्यापेक्षाही हुशार विद्यार्थी तिथे होते. परंतु ते मागे का पडले. कारण घरचा पाठिंबा आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव. त्यांच्यासाठी काही तरी करणं आवश्यक होतं, असं सचिनला वाटलं. तो इन्फोटेकचा जमाना होता. मुंबईत शिकताना ‘ऑर्कुट’ या सोशल साइटशी तो जोडला गेला. या साइटवर त्याने आधी माजी विद्यार्थी मंडळ तसेच सॉफ्टवेअर इन्फोटेक ग्रुप तयार केला. आदिवासी किंवा ग्रामीण भागातील मुलांकडे स्पर्धात्मक मानसिकतेचा अभाव असतो, गुणात्मक दर्जा नसतो. म्हणून २००७मध्ये त्याने ऑनलाइन ‘आदियुवा’ची सुरुवात केली.

‘आदियुवा’बद्दल सचिन सांगतो, ‘सुरुवातीला झालेल्या कार्यक्रमांचा फोटोसह वृत्तांत ‘आदियुवा’वर टाकला. आपल्या परिसरात अशा योजना कशा प्रकारे राबवता येईल, याची माहिती घेतली. वेगवेगळया क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र आणलं. त्यात डॉक्टर, इंजिनीअर्स होते. त्यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळवून दिलं. हे सर्व अर्थात ऑनलाइन काम केलं. हे सर्व संगणकशिक्षित विद्यार्थी असल्यामुळे हे शक्य झालं. तसंच सुट्टी मिळेल त्या वेळी मी गावात जाऊन मार्गदर्शन करू लागलो. त्याच्याबरोबर वेगवेगळया क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती असत. त्यामुळे ‘आदियुवा’च्या माध्यमातून वेगवेगळया क्षेत्रातील माणसे जोडली गेली. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळू लागली. नोकरी, कारकीर्दीविषयी मार्गदर्शन मिळू लागलं. एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन कार्यक्रम करायला पैसे लागतात, पण हे मार्गदर्शन ऑनलाइन असल्याने तो करावा लागत नसे. शिवाय इंटरनेटवर एकाच वेळी अनेकांना मार्गदर्शन करता येतं. त्यामुळे मी ऑनलाइनवर जास्त लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. त्या वेळी ई-मेल आणि आर्कुट हीच ऑनलाइन संपर्काची माध्यम होती. त्याला जोड म्हणून मी संकेतस्थळ बनवायचं ठरवलं. संकेतस्थळ बनवण्याचं कोणतंही शिक्षण न घेता मी ‘आदियुवा.इन’ हे संकेतस्थळ तयार केलं. त्यानंतर काही वर्षानी ‘आदिवासी युवा शक्ती’ (आयुष) हा ऑनलाइन गट बनवला. आदिवासी युवकांची ‘आदिवासी युवा सेवा संघ’ ही संस्था निर्माण करून तिची रितसर नोंदणी केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आज ‘आदियुवा’ आणि ‘आयुष’चा लाभ सध्या देश आणि देशाबाहेरील १० हजारांहून जास्त तरुण घेत आहेत.’
‘आदियुवा’ आज अनेक होतकरू, पण उपेक्षित तरुणांना दिशा देण्याचं काम करत आहे. याचं सगळं श्रेय सचिनला जातं. सामाजिक बांधलकीची जाणीव असेल तर काय करता येऊ शकतं, याचं प्रेरक उदाहरण आहे.

‘वारली’च्या पेटंटसाठी प्रयत्न सुरू
‘आदियुवा’तर्फे वारली चित्रकलेचे पेटंट मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. वारली चित्रकला ही कुणा एका व्यक्तीची किंवा संस्थेची नसून ती सर्व आदिवासी समाजाची आहे. तो आदिवासी समाजाचा सांस्कृतिक ठेवा आहे, या भावनेतून तिचं पेटंट मिळावं, यासाठी सचिनने प्रयत्न सुरू केले आहेत. वारलीसाठी वापरण्यात येणारे त्रिकोण-चौकोन, तांदळाचे पीठ, पाणी, माती यांची पेटंट मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुळात वारली ही कोणत्याही एका आदिवासी जमातीची कला नाही. विशेष करून मल्हार कोळी, (ठाणे जिल्हयात राहणारे) आणि वारली जमात यांच्यात ही चित्रकला काढली जाते. पण अलीकडे या आदिवासींकडून कमी पैशात चित्रं काढून ती जास्त पैशात विकली जात आहेत. विविध प्रकारे त्यांची फसवणूक केली जाते. वारली चित्रकलेचं पेटंट मिळवून त्याद्वारे ही लोकसंस्कृती जपण्याचा आणि त्यातून ही लोककला जिवंत ठेवणा-या कलाकारांना रोजगार मिळावा, त्यांचा चरितार्थ चालावा, यासाठी ‘आदियुवा’कडून प्रयत्न सुरू आहेत. वारली चित्रं जगभरात विकली जाण्यासाठी, तिची बाजारपेठ वाढवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी वारलीला आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे. ही चित्रकला टी-शर्ट तसंच इतर गोष्टींवर आता काढली जात आहे. थोडक्यात वारलीसाठी आता ‘आदियुवा’ने सामूहिक स्वरूपाची व्यापक मोहीम सुरू केली आहे. तिची संपूर्ण माहिती वारली. इन (warli.in) यावर उपलब्ध आहे.
‘बीबीसी’ बनवणार माहितीपट
सामाजिक बदल घडवू पाहणा-या २० ते ३० वयोगटांतील तरुणांवर ‘बीबीसी’ माहितीपट बनवणार आहे. सामाजिक बदल घडवणा-या या हिरोंमध्ये, ‘सोशल आंत्रप्रुनर्स’मध्ये सचिनचाही समावेश आहे. ‘आदियुवा’ ऑनलाइन असल्याचा फायदा त्याला अशा प्रकारे मिळाला. ‘आदियुवा’मुळे ‘बीबीसी’ने त्याच्याशी संपर्क साधला. फोनवरून त्याची माहिती घेतली. त्याची संपूर्ण व्यक्तिगत, नोकरीविषयी त्याचबरोबर समाजाला पुन्हा देण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत, याची माहिती घेतली. या माहितीपटात देशातील विविध भागांतील तरुणांचा समावेश असेल.
‘आदियुवा’ची राष्ट्रीय, जागतिक स्तरावर दखल
मध्य प्रदेशमध्ये नुकतंच इंदूरमध्ये एप्रिल २०१३मध्ये पाच राज्यांतील आदिवासी युवकांचं संमेलन झालं. यात महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि दिल्लीतील स्थायिक झालेले आदिवासी युवकही (जे एम्समध्ये डॉक्टर होते) सहभागी झाले होते. २० आणि २१ ऑक्टोबर २०१३ला इंदूरमध्येच आदिवासी युवकांचे राष्ट्रीय आणि जागतिक संमेलन होणार आहे. ‘विश्वस्तरीय आदिवासी युवाशक्ती फेसबुक महापंचायत-२०१३’ हे संमेलन होणार आहे. एकमेकांशी ऑनलाइन जोडलेले सगळे आदिवासी युवक ते एका व्यासपीठाखाली एकत्र यावेत, हा या संमेलनाचा हेतू आहे. सुशिक्षित आदिवासींच्या माध्यमातून नव्या आदिवासी पिढीसमोर आदर्श निर्माण व्हावा, यासाठीही या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. देशातील आणि देशाबाहेर गेलेले आदिवासी युवक संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.
‘आदियुवा’चं सोशल बिझनेस मॉडेल
हैदराबादमधील ‘आयएसबी’ बिझिनेस स्कूलने आयोजित केलेल्या ‘आयडिया चॅलेंज’ या स्पर्धेत सलग दोन वर्ष ‘आदियुवा’ने सादर केलेली सोशल बिझनेस मॉडेल अंतिम यादीत आली होती. त्यातील पहिलं होतं सोशल नेटवर्किंगचा वापर करून ग्रामीण भागात शैक्षणिक आणि व्यवसाय मार्गदर्शन करणं, तर दुस-या मॉडेलमध्ये सोशल नेटवर्किंगचा वापर सामाजिक बांधिलकीसाठी करणं. विशेषत: तरुण पिढीचं हे मनुष्यबळ चांगल्या कारणासाठी वापरलं जाऊ शकतं, हे दाखवण्यात आलं होतं. या बिझनेस मॉडेलमध्ये सामाजिक बांधिलकीला आर्थिक दृष्टिकोन जोडला होता. तसा तो जोडला जावा, ही काळाची गरज आहे, असं सचिनला वाटतं.



Find us on Facebook