क्रांतिसूर्य बिरसा मुंडा

आज आदिवासी वीर बिरसा मुंडा यांची जयंती आहे. आपणा सर्वांना भगतसिंग,राजगुरू ,चंद्रशेखर आझाद यांचा इतिहास माहित आहे पण आपल्यापैकी किती जण बिरसा मुंडा यांचा इतिहास जाणतात …?चला आज क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त त्यांचा साहसी इतिहास थोडक्यात जाणून घेवूयात !
जन्म _ आदिवासी वीर बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ मध्ये सध्याच्या झारखंड राज्याच्या रांची जिल्ह्यातील अलिहत गावामध्ये एका झोपडीत झाला . त्यांच्या आईचे नाव करमी हातु व वडीलांचे नाव सुगना मुंडा असे होते .
शिक्षण _ बिरसा लहानपणापासूनच खूप कुशाग्र बुद्धीचे व चपळ होते . त्यांचे प्राथमिक शिक्षण सलगा या गावातील त्यांच्या मावशीकडे झाले .पुढे ते मिशनरी शाळेत चाईसाबा येथील जी. सी. एल. मिडल स्कूल मधून त्यांची उच्च माध्यमिक परीक्षा पास केली . बिरासांना येथेच मिशनऱ्यांच्या दुष्ट्चक्रांबद्दलचा पहिला अनुभव आला .
मिशनरी आदिवासींचे शोषण करतात म्हणून त्यांनी मिशनरी शाळा सोडून दिली. आणि त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले .
विवाह _त्यानंतर १८९ ० -१८९४पर्यंत ते बंद्गाव येथेच राहिले ,पुढे त्यांचा विवाह हिराबाई नावाच्या कन्येशी झाला परंतु दुर्दैवाने लवकरच त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला .
बिरसा मुंडा ते भगवान बिरसा _ बिरसांना शिक्षणाबरोबरच संगीत, नृत्य यांची सुद्धा आवड होती .ते उत्तम बासुरी वाजवायचे, त्यांचा आवाज भारदस्त होता. पुढे हाच आवाज आदिवासींच्या अन्यायाविरुद्ध उठला .ते रानात गुरे चरायला नेत . त्यामुळे निसर्गात उपलब्ध असलेल्या वनऔषधीबद्दल चांगलेच ज्ञान होते ,ते आजारग्रस्त लोकांना विशिष्ट प्रकारची जडीबुटी देवून त्यांचा आजार बरा करत असत . म्हणूनच लोक त्यांना 'भगवान बिरसा' म्हणू लागले . एकदा पावसाळ्यात कडाडती वीज बिरसांवर पडली. परंतु बिरसांना कसलीही इजा झाली नाही, याउलट त्यांच्या आजूबाजूची झाडे विजेमुळे खाक झाली . या घटनेपासून इंग्रजही आश्चर्यचकित झाले व "बिरसा god है" असे ते मानू लागले,व तसे त्यांनी नमूदही करून ठेवले आहे .
कार्य _सावकार व ठेकेदारांनी आदिवासींच्या शोषणाची सीमा पार केली होती . आदिवासी जमिनीचे मूळ मालक असूनही जमीनदार व सावकार जबरदस्तीने त्या जमिनीवर ताबा मिळवून बसले होते . पण त्याबद्दल चकार शब्दही न काढण्याचा आदेश इंग्रजांनी दिले होते,परंतु बिरासांना ते सहन झाले नाही बिरासांनी लोकांमध्ये जागृती करण्यास सुरवात केली ,ते लोकांना म्हणत कि "तुमच्या जमिनी धूळ वाऱ्यासारख्या उडून गेल्या आहेत,स्वभिमानासोबत तुमचा आत्मविश्वासही संपला आहे,जर तुम्ही तुमचा आत्मविश्वास परत जागृत नाही केला तर तुम्ही तुमच्या आया बहिणींची अब्रु कशी वाचवाल …… ?"या वाक्यांचा लोकांच्या मनावर खोल परिणाम झाला . व लोकांमध्ये आत्मविश्वास जागृत होण्यास सुरवात झाली.
उलगुलान _ सन १८६९मध्ये वन संरक्षण कायदा लागू करण्यात आला,त्यामुळे जंगलावर होणारी उपजीविका बंद झाली . आदिवासींवर मोठे संकट उभे राहिले. या अन्यायाविरुद्द बिरासांनी १८९०मध्ये व्यापक क्रांती 'उलगुलान 'ची घोषणा केली . शस्त्रबळ तयार करून शत्रूंना ठार केले .
सन १८७५ मध्ये 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,आणि तो मी मिळवणारच !'हि लोकमान्य टिळकांची घोषणा देशभरात पोचली पण नव्हती ,त्याही आधीपासून बिरसांनी स्वराज्याची घोषणा करून इंग्रजी सत्तेला आवाहन केले होते हे इतिहासातील खूप मोठे सत्य किती जणांना माहित आहे … ?
बिरसांनी १८९५मध्ये समाजसुधारणेचे अभियान आपल्या हातात घेतले,जंगल,जमीन संपत्ती हा आमचा अधिकार आहे ,ते आमच्या उपजीविकेचे साधन आहे ,यासाठी सर्व आदिवासींनी एकत्र येवून लढायचे आवाहन केले . त्यांनी न्याय व अधिकारासाठी शस्त्र हाती घेतेले. जंगल राज्याची घोषणा करून ते आदिवासींचे महानायक बनले . यामुळे इंग्रज सरकार त्यांच्या मागे लागले परंतु त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले. बिरसांनी अनेक अनुयायी तयार केले. बिरसा व त्यांच्या अनुयायांनी अन्यायी सावकार व जमीनदारांच्या घरांना आग लावून दिली. हि बातमी पोलिसांनी जिल्हाधिकार्याला कळवताच बिरासांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले . ९ ऑ. १८९५ ला बिरसा व त्यांच्या वडिलांनाही ताब्यात घेण्यात आले. आणि ख्रिस्ती पाद्रींच्या साक्षीवरून त्यांना २ वर्ष कारावास व ५० रु. दंड ठोठावण्यात आला.
३० नोव्हे. १८९७ रोजी बिरसा तुरुंगातून बाहेर आले ,त्या वेळी आदिवासी समाजाची केविलवाणी स्थिती बघून ते पेटून उठले व त्यांनी स्वावलंबन व स्वाभिमानासाठी उलगुलान ची घोषणा केली.
बिरसा हे उत्तम योद्धा होते.एक कुशल प्रशासक होते. फेब्रु. १८९८मध्ये बिरसांनी आपल्या अनुयायांच्या सोबत डुंबारी बुरुज या पर्वताच्या पायथ्याशी सभा बोलावली, व १८९९मध्ये नाताळचा पहिलाच दिवस हल्ल्याचा दिवस म्हणून ठरवला. या हल्ल्यामध्ये त्यांनी पोलिस चौकी लुटायचे ठरवले,नाताळच्या रात्री आपल्या साथीदारांच्या तीन वेगवेगळ्या तुकड्या बनवून वेगवेगळ्या जागेवर हल्ले चढवले. फादरच्या घरावर हल्ले करून फादर कारवेरी व फादर हाफमान यांच्यावर बाण चालवले.
जाने. १९०० मध्ये रांचीच्या इंग्रज अधिकाऱ्यांना बिरासांच्या या हल्ल्याची माहिती मिळाली आणि जाने. १९०० मध्ये ११. वाजता इंग्रजांनी डुंबारी बुरुजावर गोळीबार सुरु केला, तेव्हाच बिरासांचे अनुयायी त्यांच्या नावाचा जयजयकार करत धनुष्यबाण व दगडफेक करत त्यांचा प्रतिकार करण्यास सुरवात केली. त्यावेळी टेकडीवर २०००पेक्षा जास्त लोकांचा जमाव उपस्थित होता,यात स्त्रिया व लहान मुलांचाही समावेश होता. या नरसंहारात २००पेक्षा जास्त आदिवासी मारले गेले,व बाकीच्यांना जबरदस्तीने ख्रिश्ती धर्म स्वीकारण्यात भाग पाडले गेले. हा नरसंहार 'डुंबारी बुरुज नरसंहार' म्हणून ओळखला जाऊ लागला.
या नरसंहारानंतर ७जाने. १९००मध्ये पोलिसांनी धरपकड सुरु केली, व पुढे ३फेब्रु. १९००मध्ये बिरसांनी आपल्या ८० अनुयायांसमवेत स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. या वेळेस तेथे उपस्थित आदिवासी बांधवांना बिरासांनी माधारी फिरण्यास व आपल्या अधिकारांसाठी लढण्याचा उपदेश केला.
त्यानंतर वयाच्या केवळ २५व्या वर्षी तुरुंगवास भोगत असताना कॉलाराने ग्रस्त होवून बिरासांची प्राणज्योत मालवली. परंतु येथेही इंग्रजांचे कपट दिसून येते,बिरासांच्या अनुयायांच्या म्हणण्यानुसार बिरासांना तुरुंगात कॉलराच्या औषधाऐवजी विष देण्यात आले होते.
बिरासांना खात्री होती कि त्यांनी सुरवात केलेल्या उलगुलान नावाच्या वादळाचा कधीच अंत होणार नाही,बिरसा अमर आहेत व आपल्यासाठी आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी आदर्श आहेत .
बिरासंच्या 'उलगुलान' ला हि बिरसाइतकेच महत्व प्राप्त झाले,उलगुलान मध्ये समाजहीत तसेच मातृभूमीच्या रक्षणासाठी लढणे आदि तत्वे समाविष्ट आहेत ,म्हणूनच लोक बिरासांना धरती आबा म्हणून संबोधतात.
आजही या महानव्याक्तीच्या पवित्र स्मृती झारखंड राज्यात आहेत. झारखंड राज्याने रांची airport व रेल्वे स्थानकाला 'बिरसा मुंडा' हे नाव देवून त्यांच्या महान कार्याला गौरविले आहे.
या महान आदिवासी वीराला आयुश तर्फे शतशः नमन !जय बिरसा !

शब्दांकन : संचिता सातवी

संदर्भ : आदिवासी वीर - जेलसिंग पावरा

Proposed Career Guidance Program (Seeking Support)

Find us on Facebook

International Day of the World's Indigenous Peoples

AYUSH @ google group