Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

क्रीडाधोरणाच्या आयचा घो..

"महाराष्ट्र देशातील सर्वात विकसित राज्य मानले जाते. क्रीडासुविधांच्या, सवलतींच्या आणि प्रोत्साहनांच्या बाबतीत मात्र पंजाब, हरियाणा, यांच्यासारखी राज्ये आपल्या खूपच पुढे आहेत. ही खंत आहे महाराष्ट्राच्या साऱ्या उदयोन्मुख खेळाडूंची. दोन सुवर्णपदके पटकाविणाऱ्या नेमबाज अनिता सय्यदची. कांस्यपदक पटकाविणाऱ्या धावपटू कविता राऊतची, कुस्तीगीरांची. कारण महाराष्ट्राला निश्चित असे क्रीडाधोरणच नाही. पार्टटाइम काम करणारे क्रीडा संचालक आणि खेळाशी सुतराम संबंध नसलेले क्रीडामंत्री यामुळे राज्याच्या क्रीडाविश्वास इतर राज्यांच्या तुलनेत झाला नाही.
कविता राऊत जिंकल्यानंतर आता जाग आलेल्या राज्यकर्त्यांनी तिला मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. अशा अनेक गरजू कविता राऊत आहेत. नगरच्या एका छोटय़ा खेडेगावातून आलेली पूजा वऱ्हाडे सध्या बंगलोरच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेत आहे. नगर ते बंगलोरचा कॅम्प यादरम्यानचा तिचा प्रवासही कवितासारखाच खडतर होता. खो-खोमध्ये विद्युल्लतेसारखी पळायची म्हणून तिला अ‍ॅथलेटिक्सच्या ट्रॅकवर आणण्यात आले. खो-खोमुळेच धावण्याचा स्टॅमिना वाढला. म्हणून मध्यम पल्ल्यांच्या शर्यतीत उतरविण्यात आले. धावायला बूट नाहीत. ७ हजारांचे बूट आणि स्पाइक्सचे १० हजार रुपयांचे बूट घालून धावणे केवळ स्वप्नातच शक्य होते पण राज्य अ‍ॅथलेटिक्स संघटनेने प्राथमिक खर्च दिला. काही देणगीदार उभे केले. पूजा वऱ्हाडेदेखील कवितासारखीच पुढे आली. सिंगापूरच्या एशियन स्पर्धेत ब्रॉन्झपदक पटकाविले. तेथेच झालेल्या ऑलिम्पिक ट्रायल्समध्येही १५०० मीटर्समध्ये ब्रॉन्झपदक मिळाले. म्हणून बंगलोरचा कॅम्प लाभला. तेथे परदेशी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळते. १६ वर्षांच्या पूजाचा अभ्यास मात्र बुडाला. १८ पूर्ण नाहीत म्हणून कुणी नोकरी देत नाही आणि स्कॉलरशिपही. खेडेगावातून आलेल्या या छोटय़ा मुलीला आधी पालक एकटे सोडतच नव्हते. पण कविता राऊत, मोनिका आठरे, ललिता बाबर या मुलींचा राष्ट्रीय स्तरावरील धावपटूंचा एक गट बनला. एकमेकींना आधार मिळाला. पालकांची काळजीही काही अंशी मिटली. पूजा वऱ्हाडेची कैफियत तीच मोनिका आठरेची आणि तीच तक्रार ललिता बाबरची. कॅम्पला येण्या-जाण्याचा खर्च कोण करणार? धावपटूंना घ्याव्या लागणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या आहाराचा, कृत्रिम प्रथिनांचा व तत्सम उत्पादनांचा खर्च कोण करणार? ८ ते १० हजारांचे बूट दोन महिने सतत धावल्यानंतर झिजतात. दरवेळी हा खर्च कोण करणार?
विजयी झाल्यानंतर लाखांची बक्षिसे देणाऱ्यांपैकी जर कुणी या स्पर्धकांना आधीपासून मदत केली तर ती सत्कारणी लागेल. प्रत्येक उदयोन्मुख खेळाडूंना वेगवेगळ्या मदतीची गरज असते. कुणाला वाया गेलेला अभ्यासाचा वेळ भरून काढायचा असतो. कुणाला घरापासून दूर राहिल्यामुळे मरगळ आलेली असते. कुणाला आहार, प्रथिने यांची गरज असते. कुणाला ‘किट’ हवे असते. यापैकी कोणत्याही प्रकारची मदत करून सच्चा क्रीडाप्रेमी आपला खारीचा वाटा उचलू शकतो. प्रत्येक आंतरराष्ट्रीय खेळाडूला वेगवेगळ्या प्रकारची मदत हवी असते. कीर्तीच्या शिखरावर पोहोचण्याआधी अशा मिळणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा मदतींचे महत्त्व आगळे असते. नाशिकमध्ये काही स्थानिक मंडळी, डॉक्टर्स, क्रीडाप्रेमी कविता, मोनिका, यांच्यासारख्यांना आधीपासून मदत करीत आहेत. गरिबीत वाढलेली ही मुले म्हणूनच आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचू शकली. कविता राऊत आज म्हणत होती, ‘मी गावात गेली, की माझे कौतुक होईल; पण घरी गेल्यावर स्वच्छ पिण्याचे पाणी आणण्यासाठी आजही मला डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन ३-४ किलोमीटर्सचा प्रवास करावा लागणार आहे.’ एशियाड कॅम्पमुळे कविताला घरी जाता येणार नाही. आईच्या हातची जोंधळ्याची भाकरी खाता येणार नाही. जन्मापासूनच अनेक गोष्टींचा त्याग करण्याची सवय असणारी ही मुलं तरीही जिद्दीने पुढे जात आहेत. आहार, क्रीडासाहित्य यांची उणीव दूर करणारी संस्था, संघटना किंवा एखादा दानशूर भेटतो. राज्य शासनाचे, क्रीडा खात्याचे कर्तव्य या संस्था, संघटना आणि व्यक्ती पार पाडतात. गरिबीत वाढणाऱ्या क्रीडा गुणवत्तेला फुलण्याचा विश्वास आपले राज्य सरकार देऊ शकत नाही, हीच खरी खंत आहे. खेळाच्या नावावर करोडो रुपयांची बरसात होते. दुर्दैवाने तो पाऊस कविता राऊत, पूजा वऱ्हाडे, मोनिका आठरे, ललिता बाबर यांच्यासारख्यांवर पडत नाही."

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=106931:2010-10-11-07-34-27&catid=28:2009-07-09-02-01-56&Itemid=5

Find us on Facebook